धरणगाव – तालुका व शहरातील काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी. पाटील व अजय पाटील यांनी पाळधी ते धरणगाव सोनवद गंगापुरी मार्गे सायकलने दौरा करत या मार्गावर असलेल्या खेड्यांमध्ये चौकसभा घेतल्या.
या सायकल रॅलीचा उद्देश मोदी सरकारने मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू दिला नाही व याउलट शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते बियाणे कीटकनाशके तसेच ट्रॅक्टर यासारखी शेतीपयोगी साधने प्रचंड महाग केली. या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करून मोदी सरकारला धडा शिकवावा, असे आवाहनही केले.
मंगळवार (दि.१६) सकाळी सात वाजता पाळधी येथून निघून या मार्गावरील पथराड, झुरखेडा, सोनवद, तरडे, पष्टाने, गंगापुरी अशी गावे करत धरणगाव नंतर दुपारी चार वाजेपर्यंत धरणगाव मध्येच विश्रांती घेतल्यावर पिंप्री, चिंचपूरा मुसळी एकलग्न मार्गे परत संध्याकाळपर्यंत पाळधी असा प्रवास करत काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी. पाटील व अजय पाटील यांनी हा सायकल दौरा केला.
त्यांच्या या सायकल दौऱ्याला धरणगाव तालुक्यातील व शहरातील सर्व काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनजागृती व प्रचारासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी. पाटील यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.