जळगाव – बेरोजगारी, महागाई, अत्याचार, जाती-पातीच, जुमलेपणाच राजकारण याला आता जनता कंटाळली असून लोकांमध्ये त्यांच्या विषयी राग दिसून येत आहे. तुमच्या मनात असलेला हा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला १३ रोजी आहे. तुम्ही त्यांना अनेक वेळा संधी दिली. आता एक वेळा आम्हाला आणि आमच्या पक्षाला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील-पवार यांनी केले.
महाविकास विकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा १९ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील केमिस्ट भवन येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, मुफ्ती हारून नदवी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, ज्येष्ठ नगरसेवक आबा कापसे, वाल्मीक पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे : विष्णू भंगाळे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यावेळी बोलतांना म्हणाले की, आधी एकतर्फी निवडणूक होईल असे वाटत होते. आता मात्र चित्र पालटले आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येणारा काळ आपला असून आपले प्रश्न संसदेत मांडणारा हक्काचा उमेदवार आपल्याला मिळाला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
भाजपचा चेहरा उघडा पडला आहे : ॲड. रवींद्र पाटील
कापसाचे भाव, महागाई, बेरोजगारी असे प्रश्न भाजप सोडवू न शकल्याने त्यांचा चेहरा उघडा पडला आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केला. जळगाव लोकसभेचा प्रचार आघाडीवर असून आपण प्रत्येक मतदारापर्यंत जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मेळाव्यात सलीम पटेल, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, मुफ्ती हारून नदवी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी महापौर जयश्री महाजन, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका पर्वताबाई भिल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.