पाचोरा – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून भाजपच्या पोटात जे आहे, ते होटावर आल्याचे दिसतेय. मराठा, बहुजन समाजाला संपविण्याचा डाव भाजपचा आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडून त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.
महविकास आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा मंगळवारी (दि. १६) पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पवार, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पवार, स्टार प्रचारक प्रियंका जोशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, पाचोरा तालुका शिवसेना प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख ॲड. दिपक पाटील, अनिल सावंत, भडगाव तालुकाप्रमुख जे.के. पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष डॉ. अमृत पाटील, नितीन तावडे, खलील देशमुख, रणजित पाटील, हर्षल पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, आम आदमी पार्टीचे योगेश हिवरकर, अस्मिताताई पाटील, योजनाताई पाटील, रमेश बाफना, शरद पाटील, अनिल सावंत, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, बंडू चौधरी, राजू काळे, पप्पुदादा राजपूत, धर्मराज राजपूत, विनोद बाविस्कर, ज्ञानेश्वर पाटील, देविदास पाटील, खंडू सोनवणे, संतोष पाटील, विकास वाघ यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. सावंत पुढे बोलतांना म्हणाले की, गेल्या ५ ते ६ दिवसांपासून बैठकांचा सपाटा सुरू आहे. हा सपाटा सुरू असताना एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते नवनवीन क्लृप्त्या करीत आहेत. ५ लाखांच्या मतांनी निवडून येवू असे सांगणारे आता तीन लाख आणि आता १ लाखावर आले असल्याचेही ते म्हणाले.
आर. ओ. तात्यांचे स्वप्न पूर्ण करा : करण पवार
जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा खासदार असावा, असे स्वप्न स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचे होते. आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असे सांगून महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार म्हणाले की, निवडणूक म्हटलं की जो-तो ज्याच्या त्याच्या पध्दतीने लढतो. मात्र, ही निवडणूक वेगळी दिसतेय. निवडणूक जाहीर झाल्यापासून चैतन्याचे वातावरण आहे. समोरच्यांकडे काहीही उरलेले नाही. ते फक्त मोदींच्या भरवशावर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
हक्काचा खासदार संसदेत पाठवा : वैशालीताई सुर्यवंशी
मेळाव्यात बोलतांना शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग महाविकास आघाडीने फुंकले आहे. ही फक्त लोकसभा आणि करणदादांची नाही निवडणूक तर संविधान आणि आपल्याला वाचविण्यासाठीची निवडणूक आहे. तुम्ही, आम्ही आज निर्णय नाही घेतला तर पुढची पिढी आपल्याला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही.
देशात सध्या द्वेषाचे राजकारण सुरू आहे. शिक्षण, आरोग्य कोणत्याही क्षेत्रात त्यांचे काम नाही. शेतकरी असो की महिला कोणीही सुखी नाही. सध्याचे सरकार हे प्रा. लि. सरकार असून या सरकारला नाकारून आपल्या हक्काचं सरकार आणि आपल्या हक्काचा खासदार संसदेत पाठवायचा आहे, असे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थितांना केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभार नंदू सोनार यांनी मानले.