रावेर – रावेर मतदार संघासाठी वरदान ठरणारा माजी खासदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा वर्षात पूर्ण होऊ शकलेला नाही. याशिवाय त्यांच्या संकल्पनेतील अनेक प्रोजेक्ट भावी काळात आपण पूर्ण करण्याचा निश्चय केलेला असल्याची माहिती विश्वास महाविकास आघाडीचे रावेर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिली आहे.
माजी खासदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत रावेर लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हिताच्या व जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी काही महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या होत्या. रावेर मतदार संघातील रावेर, यावल, चोपडा या तालुक्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सुटावा यासाठी त्यांनी मेगा रिचार्ज प्रकल्प हाती घेतला होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षाच्या काळात या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनी फारसा पाठपुरावा केला नाही. तसेच रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर हे केळी उत्पादन करणारे तालुके आहेत.
मात्र या भागात केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करण्यासाठी स्व. जावळे यांचा प्रयत्न होता. रावेर, सावदा, निंभोरा रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवाशी गाडयांना थांबा मिळावा अशी प्रवाशांची मागणी आहे. गेल्या दहा वर्षात या मागणीची पूर्तता होऊ शकली नाही. केळी रेल्वे वॅगनचा प्रश्न तसाच कायम आहे. रेल्वेतर्फे केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी वॅगन भाड्यात दिल्या जाणाऱ्या सूटचा प्रश्न सुटलेला नाही. असे शेतकरी हिताचे तसेच जनतेच्या विकासाचे अनेक प्रकल्प अद्यापही कायम आहेत. स्व. हरिभाऊं जावळे यांचे संकल्पनेतील विकासाचे अपूर्ण राहिलेले प्रकल्प , त्यांनी केलेला संकल्प भावी काळात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन नव्हे तर गॅरंटी आहे असे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले आहे.