जळगाव – भारतात ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्त्य साधून डिजिटल शिक्षण या विषयावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल क्रांती झाल्याचे दिसून आले. याच बदलाचा अभ्यास करून डिजिटल शिक्षण, संसाधने, तंत्रे आणि पद्धती अशा विविध महत्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे संपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संतोष खिराडे आणि विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगांव येथील ग्रंथपाल श्री.हितेश ब्रिजवासी यांनी ‘डिजिटल शिक्षणाकडे’ आणि ‘डिजिटल शिक्षण: संसाधने व तंत्रे’ अशा दोन भागात प्रकाशित करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे या पुस्तकांना माननीय श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील व प्र.कुलगुरू डॉ. पी.पी.माहुलीकर यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले असून. शिक्षणशास्त्र विषयातील अतिशय नामवंत व्यक्तिमत्व डॉ.ह.ना.जगताप आणि डॉ.प्रदीप आगलावे या दोन शिक्षणतज्ज्ञांच्या प्रस्तावना या पुस्तकांना लाभल्या आहे. तसेच महाराष्ट राज्यातीलच नव्हे इतर राज्यातील शिक्षण तज्ज्ञांचे अतिशय अभ्यासपूर्ण लेख या पुस्तकात समाविष्ठ करण्यात आले आहे. पुस्तकाचे प्रकाशन आणि मुद्रण जळगांव जिल्ह्यातील ख्यातनाम प्रकाशक प्रशांत पब्लिकेशन हाऊस यांनी केले आहे.
डॉ.संतोष खिराडे आणि ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी यांच्या संपादन कौशल्यातून निर्मित या पुस्तकाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.व्ही.पवार, चेअर प्रोफेसर डॉ. विवेक काटदरे, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.शोभाताई पाटील, सचिव श्री. राजेंद्रजी न्ननवरे, प्रशासकीय अधिकारी श्री.दिनेश ठाकरे, शिंदखेडा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य आणि ग्रंथपाल डॉ. तुषार पाटील, समन्वयक श्री.उमेश इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. या उदघाटन प्रसंगी कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील, संपादक श्री.हितेश ब्रिजवासी, डॉ.संतोष खिराडे, प्रकाशक श्री.प्रदीप पाटील डॉ. विवेक काटदरे, डॉ.मनीषा इंदानी यांची उपस्थिती लाभली.