बोदवड (प्रतिनिधी) – एकीकडे कडक ऊन तापत असताना अंगाची लाहीलाही होत असताना काल (दि.९) मंगळवार रोजी मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने बोदवड तालुक्यातील अनेक गावात घरांची मोठया प्रमाणावर पडझड झाली तसेच शेतातील रब्बीचे पिके भुईसपाट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आज (दि.१०) बुधवार रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील वाकी, मुक्तळ, वराड, जलचक्र येथे भेट देऊन पडझड झालेल्या घरांची व शेत शिवाराची पाहणी करून तहसीलदार यांच्यासोबत संपर्क साधून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली. एकीकडे नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असताना शेतकरी बांधवांवर आलेल्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी व सामान्य नागरिक हतबल झालेले आहे.
सर्व नेते मंडळी राजकीय कार्यात मग्न असताना रोहिणी खडसे यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना धिर दिला व नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे आपले राजकारण बाजूला ठेऊन रोहिणी खडसे या नेहमी संकटात धावून येत असल्या बाबत बोदवड तालुका वासीयांमध्ये चर्चा सुरू होती.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, मराठी नूतनवर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा सर्वत्र आनंदात साजरा होत असताना व गुढी उभारून मराठी नूतन वर्षाचे सगळीकडे हर्षोल्हासात स्वागत होत असताना अचानक आलेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली घरांवरील पत्रे उडून गेली त्यामुळे घरातील संसारपयोगी वस्तूंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत. दुष्काळी छायेत असताना विहिरीत असलेल्या कमी जलसाठ्याच्या सहाय्याने जिवापाड मेहनत घेऊन शेतकरी बांधवांनी घेतलेल्या रब्बीच्या गहू, हरभरा, मका, ज्वारी ,केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतातील पिके भुईसपाट झाले आहेत. काढणीवर आलेले पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी बंधूंचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडला असुन उद्विग्न झाला आहे.
जलचक्र बु येथे जि. प .प्राथमिक शाळेवरील पत्रे उडून गेल्यामुळे शैक्षणिक साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तसेच वादळी वाऱ्यामुळे बोदवड शहरातील कृषी पुरक उद्योग असलेल्या जिनिंग व्यावसायिकांचे सुद्धा मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे हरणखेड येथे विज कोसळून कापूस जळाल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक झळ बसली आहे. आज बोदवड तालुक्यातील वाकी, वराड,जलचक्र,मुक्तळ येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली प्रांत अधिकारी ,तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्या बाबत चर्चा केली. तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असुन त्यांच्याकडे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून आचारसंहिता बाजूला ठेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सभापती गणेश पाटील,किशोर गायकवाड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक प्रदेश चिटणीस विजय चौधरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बोदवड शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, जितेंद्र पाटील, अतुल पाटील, श्याम पाटील, अमोल पाटील, गजानन पाटील, संदीप घडेकर, अजय पाटील, बोदवड तालुका गटविकास अधिकारी निशा जाधव, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.