जळगाव – गटारीच्या कामावरून महापालिकेच्या शाखा अभियंत्यास भाजपा पदाधिकार्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अभियंत्यांच्या तक्रारीवरून पदाधिकार्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, नुतनवर्षा कॉलनी येथे गटारीचे कामाबाबत भाजपाचे पदाधिकारी भूपेश प्रकाश कुळकर्णी यांची तक्रार होती. या तक्रारीबाबत त्यांनी मनपाचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांना ङ्गोन केला असता त्यांनी संबंधित ठेकेदाराशी बोलणे करावे असे सांगितले.
दरम्यान हे काम तुम्हीच करावे असे भूपेश कुळकर्णी यांनी सांगून तुम्ही कुठे आहात मी येतो? असे विचारले. त्यावेळी आपण भाऊंचे उद्यान येथील युनिटमध्ये असतांना भूपेश कुळकर्णी यांनी तेथे येऊन माझ्या कानशिलात लगावली. यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचेही पुराणिक यांनी सांगितले. तसेच मनपा शाखा अभियंता पुराणिक यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इतर अभियंता व अधिकार्यांनी दुपारपासून कामबंद केले होते.