जळगाव – भरारी फाउंडेशन राबवित असलेल्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक, आर्थिक तसेच रोजगाराच्या दृष्टीने मदत केली जाते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना व्यवसायभिमुख साहित्य व मशीन देवून फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे.
जिल्हयातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सोमवारी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सहा पीठाच्या गिरण्या, व सहा शिलाई मशीन वाटप करण्यात आले. तसेज दोन महिलांना शेतीचे बियाणे देण्यात आले. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचे त्यांच्या शेतीच्या सातबारा उताऱ्यावर, घराच्या उताऱ्यावर नाव लागले नसल्यास त्याच प्रमाणे संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजनेंतर्गत रेशन धान्य इत्यादींचा लाभ मिळत नसल्यास प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
यावेळी आमदार सुरेश भोळे अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, रजनीकांत कोठारी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, रवींद्र गुजराथी, सुनील भंगाळे, शुभश्री दप्तरी, अनुराधा सूर्यवंशी चित्रा चौधरी नितीन सपके, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, सचिन महाजन, विक्रांत चौधरी यांची उपस्थिती होती.उपक्रमासाठी उद्योगपती रजनीकांत कोठारी, डॉ. प्रिती दोशी, राजेश चौधरी, रवींद्र लढ्ढा,बाळासाहेब सुर्यवंशी महावीर बँक अग्रवाल समाज महिला मंडळ बबलू शेख , शैलेश परदेशी संजय नारखेडे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक दिपक परदेशी यांनी तर आभार विनोद ढगे यांनी मानले.


