जळगाव – जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित आहेत. हा विषय सध्या खूप गाजत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्यावर निराधार आरोप करून सरकारची बदनामी केली होती. मात्र प्रत्यक्षक्षात दि. 13 ऑगस्ट रोजी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पीक विम्याच्या लाभासाठी बनावट माहिती सादर केली म्हणून चौकशीची मागणी केल्याचे पत्र दिले. आ. खडसेंच्या या पत्रामुळेच शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहील्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
केळी पिकविम्यासंदर्भात आ. चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे नंदकिशोर महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, केळी पीक विम्याची रक्कम शेतकर्यांना मिळत नसल्याने शेतकर्यांचा रोष पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनीच 13 ऑगस्ट 2023 रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठवून, जिल्ह्यात अनेकांनी बनावट कागदपत्रे काढून पीक विमा काढल्याची तक्रार केली होती.
तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केली होती. याच पत्रामुळे पडताळणी करण्याचे काम सुरु झाल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकर्यांना मिळत नसल्याचा आरोप केला होता. मात्र शेतकर्यांची चौकशी लावण्याचे पत्र खडसेंनीच दिल्याचे सांगत ते गझनी असल्याचा उल्लेख आ. पाटील यांनी केला. दरम्यान शेतकर्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत केळी पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचा दावाही आ. पाटील यांनी केला.