जळगाव – महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल. या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. माहेश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासक सौ. विद्या गायकवाड, के.सी. ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदी मान्यवर निमंत्रीत आहेत. सोबत शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.
रॅलीनंतर महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मा. श्रीमती अनुराधा शंकर अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) मध्यप्रदेश ह्या प्रमुख अतिथी असून, अध्यक्ष म्हणून मा. श्री. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थितीतांना गांधीजींचे पणतु मा. श्री. तुषार गांधी हे अहिंसेची शपथ देणार आहेत. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.
चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई
महात्मा गांधींनी चरखा किंवा चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. २ ऑक्टोबर ह्या दिवशी चरखा जयंती ही साजरी केली जाते त्या निमित्ताने गांधी तीर्थ येथे अखंड सूत कताई होणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीतीर्थ सुरू राहणार आहे.
खानदेश में महात्मा गांधी पुस्तकाचे प्रकाशन
महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व आज त्रिखंडात सर्वमान्य झाले आहे. या देशातल्या पहिल्या ग्रामीण कॉंग्रेस अधिवेशनाचा मान खानदेशातील फैजपूर नगरीला लाभला. गांधीजी म्हणत की, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. खानदेशात गांधीजी आलेत व खानदेश गौरवान्वित झाला. लोकमान्य टिळक फंडाच्या निमित्ताने गांधीजी खानदेशात आले तेव्हा त्यांचे कमालीच्या उत्साहात सर्वत्र स्वागत झाले. मानपत्रे व भेटवस्तु देण्यात आल्यात. त्यांचा लिलाव करून ती रक्कम फंडात जमा झाली. वेगवेगळ्या संस्थांना, सामाजिक उपक्रमांना, व्यावसायिकाना भेटून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याची मशाल तेवती राखली. यात आबालवृध्द स्त्री-पुरुषांचा उत्कट सहभाग होता. अशा अनेक घटनांची नोंद असलेल्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण
गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी कांताई सभागृहात गांधीतीर्थद्वारे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमानंतर लगेचच पारितोषिके देखील मान्यवरांच्याहस्ते प्रदान होणार आहेत. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे