जळगांव – जिल्ह्यातील दूधात व दूग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून 1 सप्टेंबर पासून दूध भेसळी विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. 15 सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध डेअरी आस्थापनांवर दूध भेसळ व वजनमापनाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली आहे.
अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.
दूध संस्था, संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर सबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेत करण्यात येणार आहे. धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देणे हा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुध्द दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत. हा यामागील उद्देश आहे.
या समितीमार्फत 1 सप्टेंबर रोजी चाळीसगांव येथे 8 डेअरीच्या तपासणीअंती भेसळयुक्त दुध नष्ट केलेले असून 4 डेअरी आस्थापनांवर वजनमापे विभागाने खटले दाखल केलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून एक सॅम्पल तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आलेले आहे. जनावरांच्या गोठ्यात अनधिकृत ऑक्सीटोसीनचा वापर आढळल्याने पशुसंवर्धन खात्यामार्फत नाशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 5 सप्टेंबर रोजीच्या धडक तपासणी मोहिमेत एरंडोल येथे 3 वजनमाप खटले दाखल करण्यात आलेले असून 22 लि. भेसळयुक्त दुध नष्ट करून, 2 सॅम्पल्स अन्न व औषध प्रशासनाकडून लॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.
दूध व दूग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, दूध संकलक, विक्रेते यांनी संकलन व विक्री करीत असलेले दूध व दूग्धजन्य पदार्थ हे उच्च गुणप्रतीचे व भेसळविरहित असले पाहिजे व सदर पदार्थाच्या वापराच्या मुदतीचा दिनांक अशा दूध व दूग्धजन्य पदार्थाच्या पॅकेट्सवर/ डब्यांवर स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्य दूध व दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. समितीमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये दोषी आढळून आल्यास संबंधितांवर लगेचच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व नियमन 2011 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ आढळल्यास जनतेने समितीस तक्रार दाखल करण्याचे आवाहन ही समितीमार्फत करण्यात आले आहे.