जळगाव – खान्देशचा नावलौकिक वाढविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा या गावी त्यांचे स्मारक करण्याचे ठरविले गेले. मात्र अजूनही ते काम अपूर्णावस्थेत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आसोदा येथे बहिणाबाई स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना स्मारकाचे काम पूर्ण होण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांच्या सातत्याच्या मागणीनंतर दीर्घकाळाने शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र हा निधी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नसावा, जाहीर केलेला निधी जर आला नाही, तर काम पुढे होणार नाही. यामुळे निधीचा विनियोग होवून काम पूर्णत्वाकडे कसे जाईल याकडे निधी जाहीर करणाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
स्मारकाच्या सुरुवातीचे प्लॅनचे डिझाईन बदलले, छतावर पत्राचा वापर केला हे चुकीचे आहे. यामुळे स्मारकाचे सौंदर्य खुंटले आहे. समितीने वारंवार हे निर्दशनास आणूनही त्याकडे दुर्लक्षच झाले. स्मारकस्थळी बारामती, मुंबई प्रमाणे प्रशस्त तारांगण करणे शक्य आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी निधी देवून कामही केले होते, त्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. स्मारक उभारणीनंतर साहित्य संमेलने, परिषदा या ठिकाणी घेता येणे शक्य होणार आहे. अपूर्ण निधीमुळे काम अपूर्णावस्थेत आहे. यामुळे वाढीव दोन कोटींचा निधी देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन दिल्यानंतर बहिणाबाईंच्या स्मारकास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेश उपाध्यक्ष संदिपभैय्या पाटील, समन्वयक पंकज बोराडे, जिल्हा सरचिटणीस हेमंत पाटील, निरीक्षक प्रसन्नजित पाटील, माजी सरपंच विलास चौधरी, रवी देशमुख, ग्रा.पं.सदस्य विजय भोळे, प्रदीप भोळे, धवल पाटील, महेश भोळे आदी उपस्थित होते.