जळगाव – जिल्ह्यात सप्टेंबरपासून कुपोषण मुक्तीसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमात सुदृढ बालक स्पर्धाही घेतली जाणार आहे. सद्यस्थितीला जळगाव जिल्ह्यात १८८९ बालके अतितीव्र कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही समस्या अतीगंभीर असून पालकांनी बालकांच्या आहाराबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पदभार स्विकारून एक महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात झालेल्या कामाचा आढावा सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण लक्षात घेता अधिक काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार बालकांचे स्क्रीनींग करण्यात आले असून त्यापैकी १८८९ बालके अतितीव्र तर ७३२६ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागातर्फे सादर करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कुपोषर मुक्तीसाठी विशेष काम करावे लागणार असल्याचे सांगितले.
पोलिसांना तीन बोटी उपलब्ध
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली. नदीपात्रात तराङ्गे बांधून वाळुचा उपसा होत असल्याने आता पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागातून तीन बोटी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकारांचे विकेंद्रीकरण करणार
जिल्हाधिकार्यांच्या अधिनस्त १६० समित्या आहेत. कामाचा व्याप लक्षात घेता अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाणार आहे. आर्थिक व प्रशासकीय क्षमता ओळखून ही कार्यवाही केली जाणार आहे. तसेच ग्रामपंचायत विभागात अनेक तक्रारी प्राप्त होतात. आता मात्र सुनावणीच्या पध्दतीत बदल करण्यात आला असून तक्रार आल्यास सुरूवातीला तांत्रिक विभागामार्फत त्या तक्रारीची तपासणी होईल त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
शहरातील उड्डाणपुलासाठी गडकरींशी चर्चा
जळगाव शहरातून जाणार्या महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन दिवसापूर्वीच मनूरच्या विकासो सचिवाचा आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर याठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी शहरवासियांनी केली आहे. आकाशवाणी चौक, अजिंठा चौङ्गुली येथे उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विभागामार्फत पाठपुरावा सुरू असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. तसेच विमानतळावरून हवाई सेवा सुरू होण्यासाठी देखिल पाठपुरावा सुरू आहे.
जिल्ह्यात ३०५ मतदारांची दुबार नावे
जळगाव जिल्ह्यात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत ९ लाख ३३ हजार मतदारांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यात ३०५ मतदारांची नावे दुबार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ३४१५ मतदारांचे छायाचित्र पुसट आहे. ४६४९ मतदार मयत असून ५६२६ मतदार स्थलांतरीत झाले असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.
लंपीमुळे ७९ पशुधनाचा मृत्यू
जिल्ह्यात लंपी या आजारामुळे ७९ जनावरे दगावली आहेत. सद्यस्थितीला ९ तालुक्यातील ११८६ जनावरे बाधित असून त्यापैकी ६८६ बरी झाली आहेत, तर ४३४ जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त शामकांत पाटील यांनी दिली. ४ लाख ९० हजार जनावरांचे लसीकरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
२१८४ शेतकरी कर्जमाङ्गीपासून वंचित
जिल्ह्यातील २१८४ शेतकरी शासनाच्या कर्जमाफी पासून वंचित असून जिल्हा उपनिबंधकांना शेतकर्यांची माहिती गोळा करून ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.