जळगाव – शहरातील जुने बसस्थानकाजवळील एका केळी व्यापाऱ्याची १० लाख २० हजाराची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीस शहर पोलीसांनी मुंबईतून अटक केली. आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता एका पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील जने बसस्थानकाजवळील मल्हारा मार्केटमधील केळी व्यापारी शालिक दौलत सोनवणे (वय-७३, रा.वराड समित ता. भुसावळ) यांचे केला सप्लायर्स नावाचे दुकान आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून केळी व्यवसाय करीत आहे. शेतकऱ्यांकडून माल घेवून इतर शहरात आणि परराज्यात पाठविण्याचे काम करतात.
यासाठी केळीचा भाव हा फोनद्वारे विश्वासावर ठरविला जात असतो. असाच एक व्यवहार मुंबईतील कांदीवली येथे राहणारा व्यापारी संतोष रामनरेश गुप्ता (रा. अतुल टॉवर हिराणेवाडी, केला मार्केट) याच्याशी केला होता. गुप्ता यांच्याशी केळी संदर्भात २० एप्रिल २०१८ पासून ते १५ जुलै २०१९ दरम्यान व्यवहार करत आले आहे.
केळीची मागणी केल्यावर सोनवणे हे ट्रक भरून केळीचा माल पाठवत होते. दरम्यानच्या काळात सुमारे ३७ लाख ८२ हजार ५४२ रूपयांचा माल पाठविण्यात आला. त्यापैकी गुप्ता यांनी २७ लाख ६१ हजार ६०० रूपये सोनवणे यांना पाठविले. उर्वरित रक्कत १० लाख २० हजार ९४२ रूपये बाकी आहे. उर्वरित रक्कमेची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात संतोष रामनरेश गुप्ता याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र सोनार यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी संतोष रामनरेश गुप्ता याला मुंबई येथून अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.