जळगाव- शहराचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे सुनील वामनराव खडके यांनी नामनिर्देशन पत्र भरले.
या उपमहापौर पदाच्या निवडीसाठी भाजपचे सुनील खडके यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उद्या ११ रोजी उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी आज १० रोजी अंतिम मुदत होती, दरम्यान भाजपकडून सुनील खडके यांचेच दोन अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका रेश्मा काळे, अनुमोदक म्हणून जितेंद्र मराठे तर दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून भगत बालाणी अनुमोदक म्हणून स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांची स्वाक्षरी आहे. सुनील खडके यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.