जळगाव – शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे. तसेच आठवड्याभरात दोन खून झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे आणि शहर पोलीसांनी संवेदनशिल भागात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
यावेळी शहरातील संवेदनशिल भाग असलेला तांबापूर, जाखानी नगर, सिंगापूर, कंजरवाडा, तुकारामवाडी या परिसरात कोंम्बिग करून गुन्हेगारांची तपासणी केली. सोमवारी रात्री उशीरा तांबापूरा परिसरातून कोम्बिंगला सुरुवात करण्यात आली. या भागातील गुन्हेगारांची कसून झाडाझडती घेण्यात आली.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात गुन्हेगारीचा कळस गाठला आहे. कोरकोळ कारणावरून चॉपर व कोयता हल्ला करून दोन जणांचा खून करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रात्री उशीरा घडल्या. येत्या दिवाळी शांततेत पार पाडण्याबरोबरच पोलीसांचा वचक असला पाहिजे म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री १२ ते पहाटे ४ वाजे दरम्यान तांबापूरापासून गुन्हेगारींची झाडाझडती करण्यास सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सपोनि गणेश काळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, हेमंत कळसकर, सुधिर साळवे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी, होमगार्डचे पथक यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खून झाल्यानंतर शहर पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी गेंदालाल मिल, राजमालती नगर, शिवाजी नगर, शिवाजी नगर हुडको, शाहु नगर परिसरातील असलेले गुन्हेगार यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात २५ अट्टल गुन्हेगारांचा समावेश होता.
यापैकी १० जण आढळून आले तर काही गावाला वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेरगावी गेले असल्याचे सांगण्यात आले. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, पो.कॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गिते, भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर, राजकुमार चौबे, ओमप्रकाश पंचलिंग यांच्यासह आरसीपी प्लाटून यांनी मध्यरात्री कारवाई केली.