जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या ३२ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या आणि तालुका ते राज्य पातळीवर विविध पदांचा तसेच कामकाजाचा अनुभव असलेल्या अमळनेर येथील तिलोत्तमा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याद्वारे ही नियुक्ती करण्यात आली असून, तिलोत्तमा पाटील ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते आजतागायत पक्षाशी एकनिष्ठ तसेच प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. पक्ष फुटीनंतर अमळनेर मधून राज्य पातळीवर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारांच्या लोकांची सांगड घालणे सोईचे होणार आहे.
आपल्या निवडीबद्दल बोलतांना तिलोत्तमा पाटील म्हणाल्या की, उत्तर महाराष्ट्रातून प्रथमच एका महिलेचा विचार पक्षाच्या मुख्य संघटनेतील महत्त्वाच्या पदाकरीता झाल्याचे समाधान वाटत आहे.