जळगाव – शिवाजी नगर येथील रेशनदुकानदार व शिंदे गटात गेलेले नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नावाखाली व्हाट्सअप ग्रुप वर दि. २७ जून रोजी रेशनकार्ड धारकांना कार्यक्रमाचा ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे व जे रेशन कार्डधारक या कार्यक्रमास हजर राहणार नाहीत त्या रेशनकार्डधारकांचे धान्य तीन ते चार महिने बंद करण्यात येईल अशी एकप्रकारे धमकीच दिली होती. तसेच हा निर्णय शासनामार्फत घेण्यात आल्याचे ही सांगण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात तसा कुठला ही आदेश नसतांना लाभार्थ्यांची दिशाभूल करून शासनाची प्रतिमा मालिन करण्यात आल्याचे आढळून आल्याने स्वस्त धान्य दुकानदार व शिंदे गटात गेलेले नगरसेवक नवनाथ विशवनाथ दारकुंडे शिवाजी नगर यांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाचे विनियमन आदेश १९७५ तरतुदीचा तसेच प्राधिकारपत्रातील अटी शर्तीचा भंग केल्याने त्यांचा दुकान परवाना निलंबित करण्यात आला आहे तसेच यापूर्वी ही रेशनदुकानदार लाभार्थींना वेळेत धान्य देत नसल्याची अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मिळाली होती त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली.
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे – चर्चा
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शासकीय जरी असता तरी या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी भाजप व शिंदे गटाचे नेते पदाधिकाऱ्यांवर नागरिकांची गर्दी जमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळेच रेशनदुकानदार व शिंदे गटात गेलेले नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आपली कालर टाईट करण्यासाठीच रेशनकार्ड धारकांवर या कार्यक्रमाला येण्यासाठी दबाव टाकला मात्र हा दबाव नवनाथ दारकुंडे यांच्या अंगाशी आला त्यामुळेच कदाचित पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांना या प्रकरणात वाचवतील व त्यांना सांगत असतील भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अशीच आज चर्चा केली जात आहे.