जळगाव – शासनाच्या विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य शासनाने सुरु केला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन काल जळगाव शहरात झाले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन्ही नेते शहरात येणार म्हटल्यावर जनतेलाही उत्सुकता लागून होती. कालच्या वर्तमान पत्रातील मोठमोठ्या जाहिराती, शहरात सर्वत्र झळकलेले मोठमोठाले होर्डिग्ज् यामुळे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून झाला. मात्र या सगळ्या गदारोळात भाव खाऊन गेले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्यातील दोन्ही मंत्री इतक्या फौजफाट्यांच्या टारगेटवर दिवसभर होते ते एकटे खडसे. वास्तविक अनुल्लेखाने मारणे हा राजकारणातील महत्वाचा भाग असतो. खडसेंच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घेतली नसती तर काल त्यांची चर्चा झालीच नसती. मात्र सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया काय असू शकते? हा अंदाज खडसे यांना होताच म्हणूनच त्यांनी आंदोलन पुकारले.
मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसा आंदोलन वगैरे करत नाही किंवा त्यांच्या सो कॉल्ड नेत्यांना, कार्यकर्त्यांनाही त्याची सवय नाही. पण काल आ. खडसे यांनी पुढाकार घेतला. पक्षात चैतन्य आणले आणि काल राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यातील प्रखर विरोधी पक्षाची संपूर्ण स्पेस भरून काढली आहे. आज जळगावात सीएम आणि डेप्युटी सीएमच्या कार्यक्रमाचा बँड वाजवण्यासाठी जबरदस्त नियोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ. खडसे यांनी राज्यकर्त्यांना कोंडीत पकडले. कापसाचा भाव हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आणि सत्ताधारी यावर काही निर्णय घेणार नाही इतकी प्रशासकीय जाण खडसे यांना होतीच. याच प्रश्नावर सीएम-ड्येप्युटी सीएमच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या जाळ्यात सत्ताधारी राज्यकर्ते अलगद फसले. जिल्ह्यातील दोन्ही मंत्री, सीएम-डेप्युटी सीएम यांनी काल दिवसभर खडसेंवरच टिका केली. त्यामुळे दिवसभर चर्चेत राहीले ते केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे आ. एकनाथ खडसे. या आंदोलनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले तर वावगे ठरणार नाही. कार्यकत्यांना पक्षाची ही नवी ओळख खडसे यांनी करुन दिली.
आपले आंदोलन उधळले जाणार व तसे व्हावे यासाठी प्रशासन काय पाऊले उचलू शकतात? प्रशासनातील कोणता आधिकारी काय वकुबाचा आहे हे प्रदीर्घ अनुभव असलेले आ. खडसे ओळखून होते. म्हणूनच अतिशय नियोजनबद्ध पाऊले टाकली. अगोदर त्यांच्या अंदाजाप्रमाणेच ॲड. रोहिणी खडसे, अशोक लाडवंजारी यांचेसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चला आता मिटले, असा प्रशासनाचा अंदाज असतांनाच युवक काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र नाना पाटील व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध गनिमी कावा करुन इच्छादेवी चौकात सीएम-डेप्युटी सीएम यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखविले.
पुढे ताफा आशावाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर येतांनाच आ. अनिल पाटील यांचे नेतृत्वात कार्यकर्त्यांची दुसरी फळी सरळ रस्त्याच्या दिशेने सरसावली. पोलिसांची तारांबळ उडाली त्याच वेळी आ. खडसे कार्यालयातून बाहेर आले व त्यांनीही गॅलरीतून ताफ्यास काळे झेंडे दाखवून मान्यवरांचे स्वागत केले. आ. खडसे व पक्षाचे आंदोलन यशस्वी झाले. एकट्या आ. खडसेंना नामोहरम करण्यासाठी काल मोठा फौजफाटा कामाला लागला होता. मात्र मिडीयात चर्चा झाली ती केवळ खडसे यांचीच. काल दिवसभर एकटे खडसे मोठमोठ्या मंत्र्यांना पुरुन उरले.


