जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुर्बिणीद्वारे अवघड असलेली हर्नियाची शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा विभागात यशस्वीपणे पार पडली आहे. शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची करून आधुनिक पद्धतीने करण्यात आली. वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
जळगाव येथील सागर बाविस्कर या तरुणाला लहानपणापासून हर्निया हा आजार होता. त्याला चालताना त्रास होत होता. त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे व चिरा मारून ऑपरेशन करण्याची भीती असल्याने सागरची तयारी नव्हती. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया होते, अशी माहिती त्याला मिळाली. लगेच त्याने शासकीय रुग्णालयात येऊन शल्यचिकित्सा विभागात तपासणी केली. तेथे वैद्यकीय पथकाने दिलासा देऊन शस्त्रक्रिया मोफत होतील सांगितल्यावर त्याला आनंद झाला.
शल्यचिकित्सा विभागात वैद्यकीय पथकाने सर्व तपासण्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करून घेतल्या. त्यानंतर आधुनिक पद्धतीने दुर्बीणद्वारे हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया हि बिनाटाक्याची असते. यात आधुनिक पद्धतीच्या जाळीचा वापर केला जातो. या शस्त्रक्रियानंतर रुग्णाला शस्त्रक्रियाच्या जागी दुखणे अत्यंत कमी असते, ही पद्धती मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात केली जाते.
शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ मारोती पोटे, सहयोगी प्राध्यापक डॉ प्रशांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक प्रा. डॉ मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, वरिष्ठ निवासी डॉ. ईश्वरी गारसे, कनिष्ठ निवासी डॉ. स्नेहा वाडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. झिया उल हक यांच्या टीमसह इन्चार्ज परिचारिका सुरेखा महाजन, परिचारिका निला जोशी यांनी परिश्रम घेतले.
सदर रुग्णाला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. ज्या रुग्णांना दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्यांनी रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभाग, ११६ क्रमांकाच्या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी केले आहे.