जळगाव – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या.
या स्पर्धा दिनांक ०९ जुन ते ११ जुन २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जैन स्पोर्टस अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू शुभम पाटील व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सदस्य श्री शेखर जाखेटे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक श्री रवींद्र धर्माधिकारी व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह व डॉ. अमित राजपूत उपस्थित होते.
याप्रसंगी पुणे येथे नुकत्याच झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करून यशस्वी सहभाग नोंदविला, तसेच साऊथ कोरिया येथे होणार असलेल्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिप मध्ये श्रीमती वृषाली पाटील यांची निवड झाल्याबद्दल बॅडमिंटन साहित्य देऊन या दोघांचा संघटनेच्या वतीने सचिव श्री विनीत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.