मुंबई | सिंधुदुर्गच्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर काल (९ नोव्हेंबर) सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार .
सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आदेश दिले. ‘वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात आणि जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे होईल. सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाने असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तर वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करावा’, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी आवश्यक असणारी जागा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जागा त्वरित हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी’, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत.