जळगाव – भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती अनादी काळापासून जगभरात गाजत आहे. ज्याचा उल्लेख आपल्या पवित्र ग्रंथांत देखील आहे. आयुर्वेदाला पुन्हा एकदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने सन 1984 मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाची स्थापना केली. सध्या हे विद्यापीठ भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाशी संबंधित असलेले डॉ.हेमकांत ऊर्फ हेमंत शिवाजीराव बाविस्कर हे देशातील तीन नेत्रतज्ज्ञ पैकी एक ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत. महाराष्ट्रासह जळगावसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. गत 17 फेब्रुवारी रोजी त्यांना विद्यापीठाने ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ म्हणून नियुक्त केले आहे.
पुढे माहिती देताना आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ डॉ.बाविस्कर म्हणाले की, यापैकीच एक म्हणजे डोळ्यांचे आजारांसाठी ते स्वत: आणि केरळ येथील नारायण नंबूदिरीपाद हे संपूर्ण देशात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यताप्राप्त आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ आहेत. डॉ.बाविस्कर हे गेल्या 26 वर्षांपासून आयुर्वेदातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषत: डोळ्यांच्या विकारांवर यशस्वीरित्या उपचार करीत आहेत. त्यांनी सांगितले की, डोळ्यांशी निगडित आजार जसे काचबिंदू (ग्लुकोमा), डोळे कोरडे पडणे (ड्राय आय सिंड्रोम), डोळ्यांना वारंवार सूज येणे (युव्हायटिस), लहान मुलांच्या डोळ्यांच्या नंबरमध्ये सतत होणारी वाढ (प्रोग्रेसिव्ह मायोपिया) तसेच मधुमेह (डायबिटीज) मुळे डोळ्यांवर होणार्या परिणामांवर ते आयुर्वेदाच्या माध्यमातून यशस्वी उपचार करत आहेत. त्यांच्या मते, आयटी क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या सर्वदूर होत आहे. ज्यावर आयुर्वेद चिकित्सा पद्धतीद्वारे औषधोपचार करता येतो.
आयुष डिपार्टमेंटविषयी माहिती देताना डॉ.बाविस्कर म्हणाले की, सध्या फक्त दिल्ली आणि गोवा येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए) स्थापन करण्यात आले आहे. भारत सरकारकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ची निवड केली जाते. त्याअंतर्गत यावर्षीही निवडप्रक्रियेत राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात डॉ.बाविस्कर यांनी केलेल्या अर्जानुसार राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ संचालक समितीतर्फे डॉ.गुप्ता व डॉ.हरिष सिंग यांनी जळगावात येऊन त्यांचे वैद्यकीय कार्य, आयुर्वेदातील संशोधन व आयुर्वेदासाठी असेलेली सामाजिक जाणीव लक्षात घेऊन त्यांना नामनिर्देशित करुन आर.ए.व्ही.मार्फत त्यांची नियुक्ती केली.
राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाद्वारे नामांकित ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ अंतर्गत 2 निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले जात असते. ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षणासोबतच, प्रॅक्टीस करुन त्यांचा प्रबंध ही पूर्ण करतात. ज्याचे सादरीकरण राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयुष मंत्रालयाकडून फेलोशिप प्रदान केली जाते. यावर्षीही देशभरातील 213 आयुर्वेद विद्यार्थ्यांना ही फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.
वर्ष 2022-23 या वर्षासाठी, देशातील तीन निवडक ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’पैकी दोन केरळ राज्यातील आहेत ज्यांच्या अंतर्गत 8 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे आणि महाराष्ट्रातील जळगाव येथील डॉ.हेमकांत बाविस्कर हे एकमेव नामांकित ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत ज्यांच्या अंतर्गत 2 निवडक विद्यार्थ्यांना परिविक्षेसाठी पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ लवकरच आयुर्वेदाच्या परिवीक्षाधीन विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा विचार करत आहे. आयुर्वेदात बीएएमएस, एमडी किंवा एमएस असलेले डॉक्टर या फेलोशिपसाठी अर्ज करु शकतात. परिविक्षा काळात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना स्टायपेंडही दिला जातो.
अॅलोपॅथी उपचारांसाठी ज्या पद्धतीने शासकीय अनुदान-सुविधा उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आयुर्वेदातही व्हायला हवे यासाठीसुद्धा डॉ.बाविस्कर प्रयत्नशील आहेत. ते म्हणतात, त्यांना जळगावला आयुर्वेदात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करायचे आहे. यासोबतच दिल्ली आणि गोवा व्यतिरिक्त जळगाव येथेही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए) स्थापन व्हावे, असे डॉ.बाविस्कर यांचे मत आहे. ते यासाठी प्रयत्नशील तर आहेतच, पण आयुर्वेदावरील संशोधन सुरु ठेवून त्याच्या प्रचारासाठी ते सदैव समर्पित आहेत.