आबुधाबी – नवीन वर्षांत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाबाबत सकारात्मक आहोत, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. तसेच अमिरातीत करोनाचा धोका कमी होता म्हणूनच यंदाची आयपीएल स्पर्धा तेथे आयोजित केली गेली. मात्र, पुढील वर्षीची स्पर्धा भारतातच होणार, असा निर्वाळा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनासाठी सकारात्मक – सौरव गांगुली.
मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे लांबणीवर पडत होती. त्यावेळी आखातात हा धोका खूपच कमी होता. तसेच अमिरातीत सरकारने सर्वांसाठी बायोबबल सुरक्षा पुरवण्याचे तसेच स्पर्धेचे नेटके आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला व आम्ही तो मान्य केला. ही स्पर्धा यशस्वी ठरली असली तरीही पुढील स्पर्धा येथेच घेण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. उलट ही स्पर्धा भारतातच घेण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहेत, असेही गांगुली म्हणाला.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ करणार आहोत. भारतातच काही ठरावीक मैदानांवर या स्पर्धा व सामने घेतले जाणार आहेत. त्यावेळी करोनाचा धोका संपुष्टात आला असेल अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे अद्याप खूप कालावधी असल्याने सर्वकाही निश्चित करण्यात आलेले नाही. आणखी काही काळाने सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यावरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, 2021 सालची आयपीएल भारतातच होणार याबाबत आम्ही ठाम आहोत, असेही गांगुली यांनी सांगितले.
नव्या वर्षी आयपीएल स्पर्धा एप्रिल व मे या कालावधीत भारतातच होईल. तसेच टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही भारतातच होणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
अजून वाचा
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा सूर्यकुमारला सबुरीचा सल्ला