जळगाव – जळगाव शहर महानगरपालिका आणि मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (Sri Sant Dnyaneshwar Primary and Secondary School) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. १० मार्च रोजी “जागरूक पालक-सुदृढ बालक” या अभियानांतर्गत वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ४५० विद्यार्थ्यांची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.
महानगरपालिकेतर्फे “जागरूक पालक-सुदृढ बालक” हे अभियान सुरु आहे. त्यानुसार संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुरुवातीला संस्थेतर्फे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ. सोनल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. सध्या शहरात साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. साथीच्या आजारामुळे मुलांचे शाळेतील हजेरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.
तपासणीमध्ये मुलांमध्ये पोटाचे आजार व डोळयांचे आजार यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. तसेच मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे गरजेचे असल्याचे डॉ. सोनल कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका शीतल कोळी, संस्थेचे सचिव तथा उप शिक्षक मुकेश नाईक, परिचारिका रत्ना पाठक, आफरीन मुगल यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होते. शिबिरासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


