जळगाव – अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून सर्जनशिलतेला चालना देण्यासाठी विविधांगी उपक्रम राबविले जातात. यात विद्यार्थी वर्षभरात कलेचे विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेत असतात. चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉटरी (मातीकाम), ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे भाऊंचे उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि. ११ ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ११ मार्च संध्याकाळी ५ वाजेला प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल.
भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरीत अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट, पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन असेल. भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत म्हणजे सकाळी ५.३० ते १०.३० व संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान पाहता येईल. हा ‘आर्ट मेला’ सर्वांसाठी खुला असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकरांनी आर्ट मेला अनुभवावा असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.