जळगाव – जळगाव शहरातील रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यंदा देखील पर्यावरण पूरक होळीचे दहन आणि हवन करण्यात आले. काव्यरत्नावली चौकात पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. होळीनंतर दिव्यांग बालकांनी पोलीस अधीक्षक आणि इतर पोलिसांना रंग लावत आनंद साजरा केला.
काव्यारत्नावली चौकात उडानतर्फे दरवर्षीप्रमाणे पर्यावरण पूरक होळीचे दहन करण्यात आले. झाडांचा पालापाचोळा टाकून होळी दहन करण्यात आले. तसेच होम हवन करीत त्यात विविध प्रकारच्या आहुती, कापूर, अत्तर, धूप, लोभान आणि इतर साहित्य टाकून हवन करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. प्रसंगी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी व गतीमंद बालकांनी पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले.
दिव्यांग आणि गतीमंद बालकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी उडान राबवित असलेले उपक्रम कौतकास्पद आहेत. आज होळी सारख्या सणाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक होळी तसेच नैसर्गिक रंगाची उधळण करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. आजच्या उपक्रमांतून इतर देखील बोध घेतील. दिव्यांग आणि गतीमंद बालकांच्या उपक्रमासाठी आमचे सदैव सहकार्य असेल, असे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.
गतीमंद बालकांनी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार तसेच इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना नैसर्गिक रंग लावत आनंद साजरा केला. पोलीस अधीक्षकांनी देखील बालकांना रंग लावत सेल्फी काढले. उपक्रमासाठी उडानचे महेंद्र पाटील, जयश्री पटेल, प्रतिभा पाटील, खुशबू महाजन, सोनाली भोई, प्रा.आर.बी.गुजराथी, हेतल पाटील, चेतन वाणी, जकी अहमद यांनी परिश्रम घेतले.