जळगाव – शालेय जीवनात असतांना विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास जलद गतीने होत असतो. या वयात मिळवलेली सुदृढ शरीरसंपती जितकी महत्वाची असते तेवढीच मनाची सकारात्मकता देखील असते यासाठी आपल्याला आवडत असलेला कोणताही खेळ मनापासून खेळला पाहिजे असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मांडले.
के.सी.ई.सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम शाळेत केंद्रीय माध्यमिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीबीएसई साउथ झोन २ बोक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन जळगाव पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे,अध्यक्ष जळगाव जिल्हा क्रीडा महासंघ,केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर,अरुण बूटे अध्यक्ष, बॉक्सीग फेडरेशन ऑफ इंडिया, केसीई संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सदस्य हरीश मिलवाणी,शाळेच्या प्राचार्य सुषमा कंची तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सीबीएसई ध्वजारोहन,एन.सी.सी.विद्यार्थ्यांची परेड,आणि मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवली गेली आणि आकाशात फुगे सोडून विजयाचा संकल्प केला गेला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते बोक्सिंग रिंग चे उद्घाटन करण्यात आले. व्यक्तिमत्त्व विकास हा विद्यार्थी दशेतील पाया असतो. यात स्वतः असलेल्या सुप्तगुण, विशिष्ट कला या तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात संधी निर्माण करतात. यासाठी प्रत्येकाने खेळाकडे वळले पाहिजे.खेळ हे शरीर आणि मनाला सुदृढ आणि ऊर्जावन बनवितात. खेळामुळे शरीर स्थिर तर मन निरोगी राहते म्हणून खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे विचार ओरियन सिबीएससी स्कूल च्या प्राचार्य सुषमा कंची यांनी प्रास्ताविकात मांडले.
यावेळी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यातील ३५० पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचं नियोजन दि.१८, १९ व २० डिसेंबर २०२२ या दिवशी बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सकाळी आठ वाजेपासून दुपारी तीन व त्यानंतर सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष नटकर व प्रेमलता चौधरी यांनी केले.यावेळी ओरियन सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व विविध भाषेतील गाणी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.