जळगाव – आई माझा गुरु.. आई कल्पतरु… अशा आमच्या गोदावरी आईंसाठी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित आई महोत्सव मातृवंदन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे.
गोदावरी आई ह्या ८९ वर्षाच्या असून त्यांचा आशीर्वाद आणि प्रेमाची छाया सर्वांवर आहे. अशा प्रेमस्वरूप गोदावरी आई यांना वंदन करण्यासाठी गोदावरी परिवारातर्फे बुधवार, दि.७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लॉनमध्ये मातृवंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या मातृवंदन सोहळ्यासाठी नैमिषारण्य व्यास गादीपती परमपूज्य भागवताचार्य शैलेंद्रजी शास्त्री यांची सपत्नीक उपस्थीती राहणार आहे. तसेच श्रीमती गोदावरी वासुदेव पाटील अर्थात गोदावरी आई ह्यांच्या परिवारातील प्रमिला भारंबे, सुधाकर भारंबे, सुभाष पाटील, सुषमा पाटील, डॉ.उल्हास वासुदेव पाटील, डॉ.वर्षा पाटील यांच्यासह नातवंड या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.
या सोहळ्याचे सार्यांनाच कुतूहुल लागले असून जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा सोहळा होत असल्याचे प्रतिष्ठीत मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे सांगितले आहे. आईचे ऋण या जन्मात फिटणे शक्य नसले तरी तिच्या कष्टाची एक स्त्री शक्ती म्हणून जाणीव ठेवतं हा भव्यदिव्य सोहळा मुळचे विवरा येथील मात्र सद्यस्थीतीला जळगाव येथ स्थायिक असलेल्या पाटील परिवाराने आयोजित केला आहे.
नुकतेच एका खाजगी कार्यक्रमासाठी जळगावात आलेले माजी खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी देखील या सोहळ्याचे कौतुक करुन नक्कीच समाजासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरेल असे सांगून गोदावरी आईंचा सन्मान केला आणि सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
विद्यादानातून विद्यार्थ्यांना घडविणार्या गोदावरी पाटील
क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रेरणेतून शिक्षणाचे महत्व जाणून घेत त्याकाळी शिक्षीका म्हणून कार्य करीत विद्यादानातून हजारो विद्यार्थी गोदावरी बाईंनी घडविले. नुसतेच शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. यात गोर-गरिबांना अल्प बचतीचा मंत्र तर दिलाच पण अनेकांच्या रेशीम गाठीही मध्यस्थीने जोडून दिल्यात. एैन तारुण्यात अचानक वासुदेव गुरुजींच्या जाण्याने एकट्या पडलेल्या गोदावरी आईंनी त्यावेळेसच्या मॅट्रिकला असलेल्या उल्हास पाटील यांना डॉक्टर करण्याचा ध्यास घेतला आणि तो पूर्ण देखील केला.
पुढे त्यांच्याच माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राचा ठेवा या जिल्ह्याला दिला आणि गोदावरी ह्या नावाची ख्याती देशभर पसरली. नर्सरीपासून ते अगदी पदव्युत्तर आणि वैद्यकीय शिक्षणाच्या सर्व शाखांचे दालन भावी पिढीसाठी खुले करुन दिले. इतकेच नव्हे तर मुंबई-पुण्यासारख्या उच्चप्रतीच्या आरोग्य सुविधा रूग्णालयाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला देणार्या गोदावरी आईंची राहणी मात्र अगदी साधी असून प्रत्येकाला आपलसं करण्याचा त्यांचा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रत्येक जण आपल्या आईला शोधतो.