जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिवराजे फाउंडेशनतर्फे श्रीमद संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहांचे दि. १ ते ७ डिसेंबर दरम्यान बाबा लॉन्स, मोहाडी रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत शहरात प्रथमच १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञदेखील होणार असून दिवसभर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन शिवराजे फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
नेहरू नगर परिसरातील शिवराजे फाउंडेशनद्वारा शहरात प्रथमच १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञ तसेच दरवर्षीप्रमाणे श्रीमद संगीतमय भागवत कथेचे आणि अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन दि. १ ते ७ डिसेंबर दरम्यान मोहाडी रोड येथील बाबा लॉन्स येथे करण्यात आले आहे. या जागेचे तुलसी विवाहाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून संत महंतांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे. महायज्ञाच्या पूजा विधीसाठी श्रीधाम वृंदावन येथील भगवान कृष्ण महाराज, काशी विश्वनाथ बनारस येथील सत्यम मिश्रा महाराज, चित्रकुट येथील विभाष शर्मा महाराज, अयोध्या येथील ऋषिराज महाराज,उज्जैन येथील कुलदीप शर्मा महाराज हे महान पंडित बसणार आहेत. सुमारे ५४० जोडप्यांच्या उपस्थितीत १०८ कुंडी महायज्ञ पूजन सकाळी ६ वाजता संपन्न होईल.
महायज्ञासह दुसऱ्या बाजूला धार्मिक कार्यक्रम सुरु राहणार आहेत. त्यात सकाळी ५ वाजता काकडा भजन होईल. दुपारी १ वाजता भागवताचार्य सोपानदेव महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद संगीतमय भागवत कथा श्रवण होणार आहे. संध्याकाळी ५. ३० वाजता हरिपाठ झाल्यानंतर रात्री ८ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ डिसेंबर रोजी हभप विश्वनाथ वाडेकर महाराज, २ रोजी हभप चारुदत्त आफळे महाराज, ३ रोजी हभप अमृत जोशी महाराज यांचे कीर्तन होईल.
तसेच, ४ डिसेंबर रोजी हभप मुक्ताबाई व शिवानी चांडक, ५ रोजी हभप रुपालीताई सवणे,६ रोजी हभप गजानन महाराज वरसाडेकर, ७ रोजी हभप शालिनीताई देशमुख इंदोरीकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. हभप सोपानदेव महाराज यांचे रविवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होईल. भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केले आहे.