जळगाव प्रतिनिधी – रोझलॅण्ड स्कूल इंग्लिश व मराठी मिडीयम शाळेचे संस्थापक एस.पी. खिमाणी सर यांची पुण्यतिथी आज (दि.१८) साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खिमानी रंगमंचाचे लोकार्पण सोहळा गट शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या हस्ते पार पडला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा व त्यातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून विद्यार्थी उपक्रम कक्षाचेही उद्घाटन करण्यात आले. या कक्षाचे उद्घाटन ख्यातनाम वकील सागर चित्रे आणि खिमानी सरांची नात सानिया प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचादेखील शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी नाहाटा कॉलेज, भुसावळ ,येथील सेवानिवृत्त प्राध्यापक विनोदजी पाटणकर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक सागर चित्रे यांनी गोवा येथे पार पडलेल्या आयर्नमॅन इव्हेंट या कार्यक्रमाबद्दलचे आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना क्रीडा आणि आरोग्य यांचे महत्त्व सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा रोजमीन खिमानी प्रधान यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीआणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.