जळगाव – “राजस्थानमध्ये जमीन व पाण्याची मुबलकता आहे त्याला जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होऊन त्यांचे उत्पन्नात वाढ करण्याची खूप मोलाची गोष्ट होऊ शकते…” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राजस्थानचे कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालन मंत्री लालचंद कटारिया यांनी दिली.
राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी, कृषी मंत्री लालचंद कटारिया, सहकार मंत्री उदयलाल आंजना, राज्य मंत्री राज्य मंत्री राजेंद्रसिंह यादव, राजाखेड़ा विधानसभा मतदार संघातील आमदार रोहित बोहरा आणि राजस्थानचे प्रशासकीय अधिकारी यांनी 18 व 19 नोव्हेंबर रोजी जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. जैन हिल्स येथील जैन उच्च कृषी तंत्रज्ञान व शेती संशोधन, विकास प्रकल्पातील फ्युचर अॅग्रीकल्चर, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक पोटॅटो उत्पादन, जैन स्वीट ऑरेंज, नियंत्रीत वातावरणात काळी मिरी उत्पादन, डाळिंब, केळी, अननस, कॉफी इत्यादीचे टिश्युकल्चर, माती विरहीत शेती, आंबा ऑर्चिड, भाऊंची सृष्टी, श्रद्धाधाम इत्यादीचा समावेश होता.
राजस्थान विधान अध्यक्ष मा. सी.पी. जोशी, कृषी व पशुसंवर्धन, मत्स्यपालन मंत्री लालचंद कटारिया व मान्यवर अतिथींचे 18 नोव्हेंबर रोजी रात्री जैन हिल्स येथे आगमन झाले. कंपनीच्यावतीने त्यांचे स्वागत उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले.
19 रोजी सकाळी भाऊंच्या सृष्टीला भेट दिली. यावेळी अजित जैन उपस्थित होते. राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कृषीमंत्री कटारिया, सहकार मंत्री आंजना, राज्य मंत्री यादव या मान्यवरांनी जैन हायटेक अॅग्री इन्स्टिट्युट अर्थात जैन उच्च कृषी तंत्रज्ञान व शेती संशोधन, विकास प्रकल्पाच्या फ्युचर फार्मिंगचे बारकाव्याने अवलोकन करून जाणून घेतले. सुरू असलेल्या शेती प्रयोगांची आस्थेने चौकशी केली. माती शिवायची भविष्यातील शेती हा प्रयोग पाहून अतिथी भारावले. जैन स्वीट ऑरेंज नर्सरी, स्वीट ऑरेंज उत्पादन क्षेत्रास त्यांनी भेट दिली. एरोपोनिक्स बटाटा प्रयोगाची देखील पाहणी केली. नियंत्रीत वातावरणात मिरी उत्पादन यशस्वीपणे करता येते हे दाखवून देणारा जैन हिल्स येथील महत्त्वाकांक्षी काळी मिरी लागवड प्रयोग सुद्धा त्यांनी पाहिला. या सर्व प्रयोग, प्रकल्पांची अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह डॉ. बी. के. यादव, के.बी. पाटील यांनी माहिती करून दिली. ‘रिसोर्स टू रुट’ ही संकल्पनेचीही मान्यवरांना ओळख करून दिली.