जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ व युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचे जनक डॉ. रमेश कापडीया यांचे “हृदयरोगापासून बचावाचे प्राथमिक उपचार” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गणपती नगरातील रोटरी क्लब जळगावच्या सभागृहात सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ ओजी सायंकाळी ६.०० ते ७.३० वेळात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन आयोजक संस्थांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे चिंताजनक प्रमाण , त्यामामागची कारणे व त्यापासून बचावाची प्राथमिक माहिती याबाबत फारच कमी लोकांना माहिती असते. यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांमधील वाढते हृदयरोगाचे प्रमाण लक्षात घेता हे व्याख्यान युवकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. अहमदाबाद येथील रहिवासी असलेले ८९ वर्षीय डॉ. रमेश कापडीया १९६४ पासून हृदयरोग्यांवर उपचार करीत आहेत. १९९१ पासून ते औषधोपचारांसह युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचा वापर करीत आहे. हजारोवर रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात विज्ञान व अहिंसा विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. १९९८ साली त्यांना प्रतिष्ठित अशा अशोक गोंधिया ताबीबी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी देश-विदेशात व्याख्याने दिली आहेत. आपल्या पाच दशकांच्या अनुभवावरून युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅम हा पर्याय नसून आवश्यक पूरक घटक असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांची या विषयावरील ९ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.