जळगाव – जिल्ह्यात नेहरू युवा केंद्र व जिल्हा परिषदच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान 2.0 हे विविध उपक्रमाद्वारे राबवले जात आहे. स्वच्छ भारत अभियान हे सवयीचा भाग होण्याची गरज आहे. गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम रहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी जनजागृती करीत ग्रामस्थांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान 2.0 च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियान २.० चे पोस्टर लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मार्केट परिसरात स्वच्छता करण्यात आली. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कचरा कुंडीचे लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, स्वच्छ भारत अभियान टप्पा २ या महाभियानात २०० गावात स्वच्छ भारत ही मोहीम राबवली जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक प्रतिबंध करावा तसेच गाव स्वच्छ तर जिल्हा स्वच्छ आणि जिल्हा स्वच्छ तर देश स्वच्छ असा संदेश त्यांनी दिला. सार्वजनिक स्वच्छ्ता ही लोकांच्या सहभागातून घडणारी क्रांती आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून स्वच्छ्ता पाळावी गाव तसेच राज्य समृद्ध होईल असा संदेश ना.गुलाबराव पाटील पाटील यांनी दिला.
नेहरु युवा केंद्र जळगाव जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छ भारत अभियान २.० ची माहिती देत जिल्हाभरात नेहरु युवा केंद्र स्वयंसेवक आणि युवा मंडळ यांच्या माध्यमाने स्वच्छ भारत २.० मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करीत स्वच्छतेविषयी जनजागृती करून प्लास्टिकविषयी दुष्परिणाम बाबत जनजागृती करण्यात आली.