जळगाव – येथील अँग्लो उर्दू हायस्कुलच्या सभागृहात तंबाखूमुक्त शाळा अभियान बाबत जळगाव शहरातील मुख्याध्यापकांची सभा संपन्न झाली.
सदर सभेत जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी विजय शां.पवार यांनी तंबाखू विरोधी मोहिमेत शाळांची भूमिका महत्वाची आहे, सर्व शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करावी असे प्रतिपादन केले. जळगाव शहरात सुमारे दोनशे शाळा असून त्यांनी “टोबॅको फ्री स्कुल ” या अँपवर शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी ही सभा घेण्यात आली.
जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती सदस्य राजमोहंमद खान यांनी अँप वर तंबाखू मुक्त शाळेचे नऊ निकष कसे नोंदवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा सामान्य रुग्णालय मधील समुपदेशक राहुल बऱ्हाटे यांनी मुख्याध्यापकांच्या शंकांचे समाधान केले.जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार सर्व शाळांनी एका आठवड्यात कार्यवाही करावी आणि तंबाखू मुक्त शाळा प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी विकास पाटील आणि महानगर पालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी दीपाली पाटील यांनी केले आहे.


