जळगाव – श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन (All India J. P. P. Jain Women’s Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म. सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटीका सादर करण्यात आली. भक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ‘नवकार मंत्र’ ने झाली. दीपप्रज्वलन कस्तुरचंदजी बाफना, राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहल, नवरतन बोकडीया, ममता कांकरिया, रिखबराज बोहरा यांच्याहस्ते झाले. स्वागतगिताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ‘जयमल गुरूवर’ हे गुरुभक्तीगीत सादर करून आचार्यांचे स्मरण करण्यात आले.
जैन समाजातील संत परंपरा महानुभावांचे संस्कार यावर आधारित संपूर्ण भारतातील जैन महिला मंडळांनी नाटिका सादर केल्यात. यात ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशनच्या जळगावच्या पदाधिकारी व महिलांनी पूज्य जयमलजी म. सा. यांच्या विचारांवर आधारित पुष्पा भंडारीद्वारा लिखीत ‘जय जीवन झाँकी’ ही नाटिका सादर केली. ‘साधुवंदना’वर आधारित नाटीका जोधपूर, नागोर, चेन्नई, नंदुरबार येथील महिलांनी सादर केले. यावेळी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. जैन महिला फाऊंडेशन, श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा राका व जोधपूरचे चंदन भंडारी यांनी केले.