नवी दिल्ली : वाढती थंडी आणि सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांचा नवीन रेकॉर्ड झाला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत ७,७४५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी आहे.
दिल्लीच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दररोज सहा हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, रविवारी (दि.८) दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. रविवारी कोरोनाचे ७,७४७ नवीन रुग्ण आढळले. तर ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, गेल्या २४ तासांत ६,०६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अशाप्रकारे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ४२ हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आहे. दिल्लीत सध्या एकूण ४१,८५७ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, येथील रिकव्हरी रेट ८८.५४ टक्के आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ९.५४ टक्क्यांवर पोहोचली आहे. मृत्यूदर १.५९ टक्के असून गेल्या २४ तासांत पॉझिटिव्ह रेट वाढून १५.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासांत राजधानी दिल्लीत ७,७४५ कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे एकूण संख्या ४,३८,५२९ पर्यंत पोहोचली आहे. यादरम्यान, ६,०६९ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३,८९,६८३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४तासांत ७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण ६,९८९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत दिल्लीत ५०, ७५४ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण ५०,९९,७७४ कोरोनाचा चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याआधी शनिवारी दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६,९५३ नवीन रुग्ण आढळले होते.
अजून वाचा
धक्कादायक! भारतातील मोठ्या फार्मा कंपनीवर ‘सायबर हल्ला’