नवी दिल्ली – ऋषभ पंतकडे महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात असले तरीही त्याची ती पात्रताच नाही, अशा शब्दात माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने ताशेरे ओढले आहेत. धोनीचा दर्जा व पंतची कामगिरी यात तुलनाच होऊ शकत नाही. धोनीने मर्यादित गुणवत्ता असलेल्या खेळाडूंकडून सरस खेळ करून घेत संघाला विश्वकरंडकासह विविध स्पर्धेत यश मिळवून दिले आहे. इथे पंतला स्वतःच्याच कामगिरीत सुधारणा करता येत नसल्याचे दिसत आहे. केवळ अन्य पर्याय वापरून पाहिले जात नाहीत म्हणून पंतचे नाव घेतले जाते असेच दिसून येत आहे.
धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2007 ची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा तसेच 2011 ची मुख्य विश्वकरंडक स्पर्धा तसेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धाही जिंकली. त्यात धोनीच्या नेतृत्वासह त्याच्या स्वतःच्या अफलातून कामगिरीचाही मोठा वाटा होता. त्यामुळे पंत त्या दर्जाची कामगिरी करेल असा विचारही केला जाऊ शकत नाही, असेही गंभीर म्हणाला.
धोनीने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर जवळपास दीड वर्षे विश्रांती घेतील होती. या काळात पंतला सातत्याने संधी दिली गेली. मात्र, तरीही त्याच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. पंतसह अनेक पर्याय वापरून पाहिले गेले तरीही योग्य खेळाडू गवसलेला नाही. पर्यायी यष्टिरक्षक म्हणून लोकेश राहुलकडे दुहेरी जबाबदारीही देण्यात आली आहे. आता नवोदित खेळाडूंमधूनच एक चांगला गुणवत्ता असलेला खेळाडू शोधण्याचे काम बीसीसीआयला करावे लागणार आहे. मात्र, पंतकडे धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जाऊ नये, असेही गंभीर म्हणाला.
पंत हाच धोनीचा वारसदार असल्याचे माध्यमांनी सातत्याने सांगितले आहे. मात्र, याबाबत आता माध्यमांनीही पंतची बाजू घेत राहण्याचा अट्टहास सोडला पाहिजे. पंत हा चांगला खेळाडू आहे पण त्याच्याकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात राहिले तर त्याच्यातील चांगला खेळाडू मागे पडेल व त्याच्यावर सातत्याने सरस कामगिरी करण्याचे दडपण कायम राहील. त्याला त्याचा खेळ करू देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे माध्यमांनीही पंतला धोनीचा पर्याच म्हणून पुढे करणे थांबवावे, असे आवाहनही गंभीरने केले आहे.
अजून वाचा
भारत जिंकणार का ऑस्ट्रेलिया? – वसीम अक्रम