कराची : आयपीएल संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम याने या दौऱ्याबाबत भाकीत केलं आहे. टेस्ट सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया विजयाची दावेदार असली, तरी दोन्ही टीम मजबूत असल्यामुळे कांटे की टक्कर होईल, असं अक्रम म्हणाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
भारताच्या या दौऱ्याबाबत वसीम अक्रम त्याचं युट्यूब चॅनल ‘क्रिकेट बाज’वर बोलत होता. ‘ऑस्ट्रेलियाची फास्ट बॉलिंग जगातली सर्वोत्तम आहे. त्यांच्याकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉस हेजलवूड यांच्यासारखे दिग्गज बॉलर आहेत. या दोन्ही टीममध्ये अटीतटीची लढत होईल, पण मला वाटतं की ऑस्ट्रेलिया विजयाची दावेदार आहे’, असं वसीम अक्रम म्हणाला.
जसप्रीत बुमराहच्या घातक बॉलिंगच्या नेतृत्वात भारत खेळणार आहे. भारताच्या मजबूत फास्ट बॉलिंगमुळे ही सीरिज रोमांचक होईल. बुमराह, शमी, सैनी आणि इतर बॉलर चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया अक्रमने दिली.
टीम इंडिया बदलली
‘भारतीय टीम जेव्हा मैदानात उतरते, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास बघण्यासारखा असतो. त्यांचे शारिरिक हावभाव बदलले आहेत. टीम म्हणून त्यांचा स्वत:वरचा विश्वास वाढला आहे. 90 च्या दशकात आमच्या टीममध्येही असाच आत्मविश्वास होता. भारतीय खेळाडू खूप मेहनत करतात. त्यांचे शारिरिक हावभाव पाहूनच त्यांचा आत्मविश्वास कळतो,’ अशा शब्दात अक्रमने भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं.
आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौरा
आयपीएलची फायनल 12 नोव्हेंबरला झाल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. 2018 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टेस्ट सीरिज 2-1ने जिंकली होती. पण त्या सीरिजमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर खेळले नव्हते. बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी दोघांवर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती. स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाची टीम मजबूत झाल्याचं अक्रमचं म्हणणं आहे. असं असलं तरी तिथल्या खेळपट्ट्यांवरही गोष्टी अवलंबून आहे. कुकाबुराचा बॉल जुना झाल्यानंतर तुम्हाला रन रोखाव्या लागतात, कारण विकेट घेणं कठीण होतं, असं मत अक्रमने मांडलं.
अजून वाचा
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा सूर्यकुमारला सबुरीचा सल्ला