जळगाव – हाडांचे आरोग्य भारतात सर्वात जास्त दुर्लक्षित केले जाते. २०१३ मधील ‘ इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशन’च्या अहवालानुसार ८०% शहरी भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे ऑस्टिओआर्थराइटिस या सांध्यांच्या आजाराचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. या आजारात हाडांचा -हास होतो . हाडांना क्षीण करणारा हा आजार मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये बळावत चाललाय. हा आजार प्रामुख्याने गुडघे, नितम्ब आणि घोटे अशा वजन सहन करू शकणाऱ्या सांध्यांना प्रभावी करून निकामी करतो.
२०१२ साली ‘ इंडियन ऑर्थोपेडीक असोसिएशन ‘ ने हाडांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी दर वर्षी ऑगस्ट महिन्यात ” हाड आणि संयुक्त दिवस” साजरा करण्याची घोषणा केली. म्हणूनच या दिनानिमित्त अस्थिरोग संघटनेच्या वतीने एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले . यात अस्थिरोगतज्ज्ञ आणि अस्थिरोग संघटनेचे सचिव डॉ. . भूषण जे . झंवर यांनी ‘ हाडे आणि सांध्यांचे विकार ‘ याविषयावर माहिती दिली. त्यांनी ऑस्टिओआर्थराइटिस आणि हाडे आणि सांध्यांच्या वाढत्या परिणामांविषयी , हे आजार टाळण्याविषयी तसेच त्यावरील आधुनिक उपचार पद्धतींविषयी सखोल माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.
या वर्षी या कार्यक्रमाची थीम होती, ‘ प्रत्येकी एक (हाड) वाचवा ‘ ऑस्टिओआर्थराइटिस या आजारात हाडे क्षीण होत जातात . गुडघे, नितम्ब आणि घोटे यासारख्या सांध्यांवर याचा तीव्र परिणाम होतो. त्रस्त रुग्ण सांध्यांमध्ये ताठरपणा आल्याची तक्रार करतात . कधी कधी सांध्यांवर सूजही येते. सूज आलेले सांधे अतिरिक्त हाडाच्या वाढीमुळे एकतर कठीण होतात तर कधी संधीचे अस्तर घटट झाल्यामुळे मऊ किंवा डळमळीत झालेले दिसून येतात.
वरील प्रकारच्या त्रासात रुग्णांनी साधारणपणे पुढील प्रकारे काळजी घ्यावी , असे डॉ. भूषण झंवर सुचवतात -निरोगी वजन: शरीराच्या १ किलो वाढीव वजनाच्या परिणामस्वरूप आपल्या गुडघ्यांवरील भार २ ते ४ किलोने वाढत असतो. शरीराच्या अतिरिक्त भारामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे लठ्ठ आणि जास्त वजन असलेल्या लोकांना ऑस्टिओआर्थराइटिस होण्याचा जास्त धोका असतो .
– सकस आहार: आहार ज्यात योग्य प्रमाणात पोषक तत्वांचा, कॅल्शियम आणि विटमिन ‘डी ‘ चा समावेश असेल अश्या आहारामुळे हाडे आणि सांध्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
– नियमित व्यायाम: नियमित व्यायामामुळे सांध्यांची हालचाल सुलभ होते , लवचिकता आणि कार्यपद्धती सुधारण्यास मदत होते तसेच निरोगी वजनही राखता येते . ऑस्टिओआर्थराइटिस असलेल्या रुग्णांना ‘ कार्डिसेप्स ‘ आणि ‘ हॅमस्ट्रिंग्स’ या स्नायूंना बळकट करण्याची प्रमुख आवश्यकता असते. त्यासाठी स्नायूंना गुरुत्वाकर्षण आणि प्रतिकाराविरुद्ध कार्य करण्याची शक्ती देणारे , वजन उचलण्याचे व्यायाम रुग्णांनी करावे .
– योगासने उत्तम : जोमदार हालचाली नसल्यामुळे ऑस्टिओआर्थराइटिस रुग्णांना योगासने करणे अधिक सुरक्षित असते. नियमित योगासनांमुळे गुढग्यांची हालचाल आणि कार्य सुधारते. सांधेदुखी कमी होऊन स्नायूंना बळकटी मिळते . हालचालींची गती सुधारून संतुलन येते.
-अति वापर नको : सांध्यांचा अति वापर टाळावा. सकस आहार आणि नियमित व्यायाम करत असताना सांध्यांचे थकणे देखील टाळता आले पाहिजे. गुडघ्यात वाकणे, वारंवार बसणे, पाय आडवे करून बसणे, किंवा गुडघे टेकून बराच वेळ बसल्यामुळे ऑस्टिओआर्थराइटिसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सांध्यांवर ताण पडेल अश्या कामांचा अतिरेक शक्यतो टाळावा.