मुक्ताईनगर – राष्ट्रवादीच्या सौ.रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर मतदारसंघात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून सुरु असलेल्या जनसंवाद यात्रेला बोदवड तालुक्यात सर्वत्र ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी मॉडेल ठरणारी असून यात्रेदरम्यान मोठया संख्येत सदस्य नोंदणी होत आहे. त्यामुळे आता बोदवड तालुक्यात जिकडे पहा तिकडे फक्त राष्ट्रवादीच दिसत आहे.आदरणीय पवार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी रोहिणीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी साळशिंगी येथील जाहीर सभेत केले.
यावेळी बोलतांना भैय्यासाहेबांनी पुढे सांगितले की, संपूर्ण जनसंवाद यात्रेतंर्गत किमान २० हजार नवीन सभासद नोंदणी अपेक्षित आहे आणि ती निश्चितपणे होईल. जनसंवाद यात्रा ही अतिशय यशस्वीरित्या व नियोजनाबध्द राबवली जात असल्याबद्दल सौ.रोहिणीताई खडसेंसह दोन्ही यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे व निवृत्तीभाऊ पाटील यांचे त्यांनी अभिनंदन केले. बोदवड तालुक्यातील यात्रेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खास करून तालुकाध्यक्ष आबा पाटील यांचेसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. तसेच नाथाभाऊंनी बोदवड तालुका निर्मितीसह बोदवड उपसा सिंचन योजनेचा घेतलेला निर्णय तालुकावासियांसाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे भैय्यासाहेबांनी स्पष्ट केले.
यात्रेदरम्यान सौ रोहिणीताईनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावागावात त्यांना ग्रामस्थांकडून समस्यांचे निवेदनही देण्यात आले. या समस्या नाथाभाऊंच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मदतीने सोडवण्याचे आश्वासन यावेळी रोहिणीताई खडसे यांनी दिले.
यावेळी प्रमोद धमोडे यांनी व्यक्त केलेले मनोगतसुद्धा प्रभावी ठरले. जनसंवाद यात्रेचा उद्देश स्पष्ट करून गेल्या निवडणुकीत ज्या ९० हजार लोकांनी ताईवर विश्वास टाकला. तो विश्वास आणि त्यामुळे आलेली जबाबदारी स्वीकारून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रोहिणीताई आपल्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सद्यस्थितीत लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा तळमळीने प्रयत्न करणाऱ्या त्या एकमेव नेत्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.