जळगाव – लोकसंघर्ष मोर्चातर्फे आदिवासी दिनानिमित्त मंगळवारी शिवतीर्थ मैदानावर आदिवासी गौरव उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेतून आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक वाद्य, वेशभूषा, नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले.
यावेळी आदिवासी बांधवांनी जल, जंगल, जमीन ही निसर्गाच्या सान्निध्यात मिळालेली अनमोल भेट आहे. ती कायम जपण्यासह तिचे संवर्धन, जतन व संरक्षण करण्याचा संकल्प केला. शिवतीर्थ मैदानावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तंट्या भील, वीर एकलव्य, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. जिल्हाधिकारी राऊत व लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी मनाेगत व्यक्त केले.
रॅलीमध्ये ‘आमची संस्कृती आमचा अभिमान, आमची अस्मिती आमचा स्वाभिमान, ‘वसुंधरेचा ठेवा जपूनी राखू सृष्टीचा सन्मान, निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही, आदिवासी म्हणुनी आहे आम्हा अभिमान… या घोषणासह आम्ही सर्व एक आहोत या घोषणा आदिवासी बांधवानी दिल्या. तसेच त्यांनी केलेल्या पारंपरिक वेशभूषा, वाद्ये, नृत्याने शहरवासीयांचे लक्ष वेधले. शिवतीर्थ मैदानावरून निघालेल्या रॅलीचा एकलव्य क्रीडा संकुलात समारोप झाला. यावेळी नगरसेवक विष्णू भंगाळे, गनी मेमन, विनोद देशमुख, भरत कार्डिले, कैलास मोरे उपस्थित होते.