जळगाव प्रतिनिधी – बसस्थानकात एका डॉक्टरचे पाकीट चोरणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी थेट पोलिसाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी बसस्थानकात घडली. पाेलिसांनी दोघांना अटक केली आहे.
चंद्रकांत आठवले (वय ३२, रा. शिवाजीनगर) व सरला पीतांबर ठाकूर (वय २१, रा. विजयनगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या दोघांनी बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत डॉ. राहुल सांडू असरवाल (रा. अजिंठा) यांचे पाकीट चोरले. डॉ. असरवाल यांना दोघांवर संशय आला. त्यांनी दोघांकडे पाकीट मागितले. त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर डॉ. असरवाल हे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेेले.
गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी जुबेर सिराज तडवी व अमित मराठे यांनी तत्काळ बसस्थानक गाठले. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी थेट तडवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तडवी यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना माहिती दिली. महिला पोलिस भारती देशमुख व प्रतिभा पाटील हे पथकासह बसस्थानकात आले हाेते.