जळगाव – स्वर्गीय वसंतराव चांदोरकर यांच्या (दि.८ जुलै) स्मृतिदिनानिमित्त एका वेगळ्या व अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. ९ जुलै २०२२ रोजी कांताई सभागृहामध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्ताने नुकत्याच निधन झालेल्या भारतरत्न लतादीदींनी ना प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा योग आला आहे.
लतादीदींनी गायलेल्या अभिजात संगीतावर आधारित रचनांचा “घरंदाज सूर” हा दृकश्राव्य अविष्कार असणार आहे. पुणे आकाशवाणी वर कार्यक्रम अधिकारी म्हणून सेवाव्रत असलेल्या प्रभा जोशी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना सहकार्य डॉक्टर मृणाल चांदोरकर करणार आहेत.विख्यात गायिका लता मंगेशकर यांचा सूर म्हणजे साक्षात सरस्वतीचं मूर्त रुप. भारतरत्न पुरस्कार प्राप्त लता मंगेशकर यांची किर्ती कित्येक वर्षांपासूनच जगभरात दरवळत राहीली.
भारतीय चित्रपट संगीत क्षेत्राची ही जणु अनभिषिक्त सम्राज्ञी. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या सारख्या महान गवैया कडून संगीताचा वारसा वंश परंपरेनी मिळाला तरी लता मंगेशकर यांची दैदिप्यमान कामगिरी घडली ती चित्रपट संगीत क्षेत्रात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या महान परंपरेत ज्या दिग्गज गायिका होऊन गेल्या त्यात दीदींचं नाव आलं नाही. परंतु या दिव्य सूरांनी चित्रपट संगीतातूनही घरंदाज शास्त्रीय संगीताचे सगळे आदर्श दाखवत आपली वंश परंपरा आणि गायकी सिद्ध केली.
त्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण गायकी सोदाहरण उलगडून दाखवणारा कार्यक्रम ‘ घरंदाज सूर ‘ चुकवू नये असा हा कार्यक्रम शनिवार दि. ९ जुलै रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता कांताई सभागृहात संपन्न होणार आहे. तमाम जळगावकर रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती दोन्ही संस्थानी केली आहे.