अमरावती प्रतिनिधी – माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक १) न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी साेमवारी कडू यांना २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ राेजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली हाेती. बैठक सुरू असतानाच आमदार कडू यांनी तापी नदी प्रकल्पासंदर्भात ‘मटकी फोडो’ आंदोलन केले होते.
या आंदोलनादरम्यान आमदार कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीअंती सोमवार, ४ जुलैला निर्णय देताना न्यायालयाने कडू यांना वेगवेगळ्या कलमान्वये एकूण २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून अॅड. सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला.