जळगाव – राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेल्या एकनाथ शिंदे यांचे घर गाठत जळगावच्या सहा बंडखोर नगरसेवकांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली तसेच शिंदेंसह गुलाबराव पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
जळगाव मनपात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हाेती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंड पुकारत शिवसेनेची साथ धरली हाेती. त्यानंतरच्या काळातही शिंदे यांनीच न्यायालयीन लढ्यासाठी सहकार्य केल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. आता शिंदे यांनीच शिवसेनेसाेबत बंड केल्यानंतर ते गुरुवारी मुंबईत दाखल हाेत आहेत.
त्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जळगाव मनपातील बंडखोर नगरसेवक अॅड. दिलीप पाेकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, रेश्मा कुंदन काळे, प्रतिभा गजानन देशमुख व ज्याेती बाळासाहेब चव्हाण यांनी शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ३५ मिनिटांच्या या भेटीत शिंदे यांनी केलेल्या मदतीमुळेच आगामी काळात साेबत राहणार असल्याचे सांगितले. तसेच नगरसेवकांनी गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला हाेता. यावेळी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चाैधरी उपस्थित हाेते.