जळगाव – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्नांची संख्या वाढावी व दर्जेदार सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना पुरविता याव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण करण्यासोबतच आरोग्य केंद्रांच्या परिसरात आयुर्वेदिक बगीचे साकारण्यासाठी जिल्हाभरातील तालुका व वैद्यकीय अधिकारी कार्यालयांनी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.
आरोग्य कार्यकारी समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी साने गुरुजी सभागृहात पार पडली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांचेसह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी हर घर दस्तक योजनेंअंतर्गत जिल्हाभरात झालेल्या लसीकरणाचा आढावा घेतला तसेच पुढील आठवडाभरात लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना देखिल दिल्या.
शहरी भागात लसीकरणाचा वेग कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कर्मचारी संख्या अपूर्ण पडत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ग्रामीण भागातील कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात मदतीसाठी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्या सोबतच हर घर दस्तक अभियानात ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामगिरी कमी असेल अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कारवाई करण्याच्या सूचना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. काही तालुक्यात समाधानकारक काम होऊ शकत असेल तर अन्य तालुक्यात कामगिरी का कमी होते ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याच्या सूचना देखील करण्यात आल्या.
जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात प्रसूती विना पारिचारिकेची होता कामा नये यासाठी स्पष्ट निर्देश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रात फर्निचर करण्यास अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्नांचा ओढा वाढला पाहिजे या साठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या. या पुढे रुग्नांच्या सोयी सुविधाबाबत कोणतीही तक्रार येत कामा नये असे निर्देश देखील देण्यात आले.
अंगणवाडी तपासणी सोबतच कुष्ठरोग तपासणी, बालकांमधील दोष , कमतरता तपासणीचा आढावा देखील यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला. या पुढे कोणतेही कारणे न सांगता लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देखील या वेळी देण्यात आल्या. जे समुदाय वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र , किंवा उपकेंद्रावर गैरहजर राहत असतील त्यांचेवर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कारवाई करावी अन्यथा मला कारवाई कारवाई करावी लागेल असे स्पष्ट निर्देश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या बैठकीत दिले.