जळगाव प्रतिनिधी – जुन्या भांडणातून उफाळून आलेल्या वादामुळे मासूमवाडी परिसरात जमावाने महिलांसह तरुणावर हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १७ मे रोजी रात्री ९.३० वाजता घडली होती.
बर्फाचा गोळा विक्रीची हातगाडी लावण्यावरून १२ मे रोजी दोन गटात वाद झाला होता. या वेळी जाकीरखान नशीरखान याला चार ते पाच जणांनी मारहाण केली होती. याप्रकरणी जाकीरखान नशीरखान याच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला हाेता.
याच भांडणाच्या रागातून मंगळवारी रात्री शाहरुख इकबाल ऊर्फ शहारुख मांडा, अफसरखान जाकीरखान, शहारुख पिंजारी,अशफाक शहा उस्मान शाह,जावेद शाह उस्मान शाह, मुस्तकीम खान हे हातात काठ्या व लोखंडी पाइप घेऊन आले. जोराने ओरडत मासूमवाडीत जाकीरखान नशीरखान यांची बहीण मुमताजबी नासरीन यांच्यावर दगडफेक केली.
मुमताजबी,हमीदाबी,रुकसार व अमिनाबी या महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. मुमताजबी यांचा मुलगा जावेदखान ऊर्फ गुड्डू यास लोखंडी पाइपने मारहाण करत दुखापत केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मारहाण करणारे पळून गेले. मारहाणीत जावेद खान जखमी झाला. मुमताजबींच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्यां विरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.