जळगाव (प्रतिनिधी) – शेअर बाजाराचे विख्यात तंत्रविश्लेषक आणि किरण जाधव ॲण्ड असोसिएटसचे सीएमडी किरण जाधव हे शहरात येत असून, त्यांचेसमवेत प्रख्यात तंत्रविश्लेषक आशिष केळकर आणि ज्ञानेश्वर बढे यांचा ‘व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट’ या विषयावर दि. ३० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रात्री ८ ते १० या वेळात आयोजित करण्यात आला आहे.
आज गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांमध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते ते शेअर मार्केटचे. पूर्वी आपल्या भागात केवळ मोजक्या लोकांपुरते मर्यादित असणाऱ्या या क्षेत्राकडे कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर सामान्य माणूसदेखील वळला आहे. मात्र पुरेसे ज्ञान नसल्याने, त्यात तो काही प्रमाणातच यशस्वी होत आहे. मात्र या क्षेत्राचे सखोल ज्ञान प्राप्त झाल्यास या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीचे सुवर्णसंधीत रुपांतर करणे त्यांना शक्य होणार आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, ‘व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट’ या विषयावर लाइव्ह टॉक शो च्या माध्यमातून शेअर बाजाराचे विख्यात तंत्रविश्लेषक आणि किरण जाधव ॲण्ड असोसिएटसचे सीएमडी किरण जाधव यांच्यासमवेत प्रख्यात तंत्रविश्लेषक आशिष केळकर आणि ज्ञानेश्वर बढे शहरवासियांना विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.
सद्यस्थितीत रशिया आणि युक्रेन यांच्या युध्दजन्यपरिस्थिती तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या भीतीने शेअर मार्केटमधील गुंतवणूक कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच शेअर मार्केटचा निर्देशांक खाली घसरला आहे. या परिस्थितीत गुंतवणूकीच्या काय संधी आहेत तसेच उद्याचा भारत हा आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या संधी, तसेच तुमच्याजवळ असलेल्या सद्यस्थितीतील शेअर्स, ज्यांचा केवळ दर वाढत नसल्याने, ते सांभाळून ठेवण्यात आले आहेत, अशा शेअर्सचे काय करावे? याविषयावर या टॉक शोमध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा टॉकशो विनामूल्य असला तरी त्यात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून, नाव नोंदणीकरिता ९८२३३३६५२४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन बढे कॅपिटल्सतर्फे करण्यात आले आहे.