जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावे, विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापन करावे या मागण्यांबाबत युवासेनेतर्फे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांना निवेदन देण्यात आले.
युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात येतील त्याबाबत लवकरच पत्रक काढण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी उपस्थित युवासैनिकांना दिले. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खासगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्या असा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. मात्र, विद्यापीठाच्या पातळीवर असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे विद्यापीठातील विभागांची नावे, सर्व महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत.
विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे तसेच विद्यापीठात स्वतंत्र मराठी भाषा भवन स्थापन करण्यात यावे अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांना युवासेना सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, जितेंद्र बारी, अमित जगताप, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, गिरीश सपकाळे, भूषण सोनवणे, अमोल मोरे, प्रितम शिंदे, विद्यापीठ युवाधिकारी अनिकेत पाटील, ॲड अभिजीत रंधे, यश सोनवणे, मयूर रंधे, सागर पाटील, ध्रृवा पाटील, पुष्पक सूर्यवंशी व युवासैनिकांनी मागण्यांचे निवेदन कुलगुरुंना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.